अजीर्णमंजिरी
केशरी रंगाच्या, आंबटगोड चवीच्या अशा संत्र्यांच सिझन जवळजवळ संपत आला. तरी जीभेवर चव रेंगाळतच असेल ना ! तशी संत्री वर्षभरच मिळतात म्हणा ! पण सिझनल फळ हे त्याच सिझनमधे महत्वाचे.
संत्रे गुणांनी गोड आणि आंबट, पचायला जड, ह्रदयासाठी चांगले, तहान शमवणारे, जीभेला रुचि आणणारे ,अग्नि वाढविणारे, वातशामक आहे.
भरपूर रस असलेल्या या फळाची सालही उपयुक्त आहे. संत्र्यांच्या सालाची पावडर आंघोळीवेळी अंगाला लावली तर उन्हाळ्यात घामामुळे येणारा ओशटपणा निघून जातो आणि त्वचेचा टोन चांगला रहातो.
अशा या संत्र्याचे अपचन झाले तर काय करायचे ? यावर थोडा गूळ खाणे, हा उत्तम उपाय.
थंडीमध्ये अजून एक मिळणारे फळ आहे- बोरं. बोरे गोड, पचायला जड, वात पित्त कमी करणारे, पोषक, सारक अशी असतात. ठराविक ऋतुत मिळतात, कधीतरीच आणली जातात आणि तीही एकदम किलोभर. त्याचप्रमाणात खाल्लीही जातात. नेहमी सवय नसलेला पदार्थ अचानक खाण्यात आला तर तो नीट पचेलच असं नाही.
जर बोरांच्या बाबतीत अस झालं तर मस्त पैकी थोडं गरम पाणी प्यावे. बोरे पचून जातात.
ग्रीष्म ऋतुत मिळणारे आकाराने बोरांसारखेच पण रंगाने जांभळे असे जांभूळ. तुरट आणि गोड चवीचे, थंड, कफपित्तनाशक, वातवर्धक, मलाला बांधून ठेवणारे असे हे फळ.
जांभळे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. फक्त उन्हाळ्यात मिळत असल्याने हव्वी तेवढी जांभळे एकावेळी खाणे हे साहाजिकच आहे. त्यातही सुट्टी गावाकडे घालवित असाल तर बघायलाच नको.
एका वेळी खूप जांभळे खाऊन ती पचली नाहीत तर 1/2 चमचा सुंठ पावडर थोड्या कोमट पाण्यातून घ्यावी की झालं. किती सोप्पं आहे ना ! या उन्हाळ्यात नक्की लक्षात ठेवा
