rooftop yojana maharashtra mavataran:१०० युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्रय रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलार (SMART) योजना राबविणेबाबत.
राज्यातील वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या वीजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायु या ऊर्जा संसाधनांपासून होत आहे. सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरुपात असून भविष्यात संपुष्टात येणारी आहेत. अशा ऊर्जा स्रोतांचा बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदुषणात मोठी भर पडत आहे. यामुळे वैश्विक तापमान वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे.
ग्लासगो येथे झालेल्या COP२६ परिषदेमध्ये भारताने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ५०० गिगॅवेंट ठेवले आहे. तसेच सन २०३० पर्यंत ५० टक्के इतकी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून निर्माण करणे, एकूण अनुमानिक कार्बन उर्त्सजन १ अब्ज टनांनी कमी करणे, कार्बन तीव्रता २००५ च्या आर्थिक पातळीपेक्षा ४५ टक्क्यांनी कमी करणे तसेच २०७० पर्यंत निव्वळ शुन्य उत्सर्जनासाठी प्रयत्नशील राहण्यास भारताने कटीबध्दता दर्शविली आहे.
दारिद्र्य रेषेखालील अथवा मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बील ही त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मोठी खर्चाची बाब आहे. त्यामुळे सदर ग्राहकांना मासिक वीज बील वेळेवर भरणे जिकरीचे बनले आहे. त्याकरिता अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढविणे व वीजेच्या वापराचे बील शून्यापर्यंत कमी करणे असा दुहेरी उद्देश साध्य करणे गरजेचे आहे.
त्यामुळे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे व घरगुती वीज ग्राहकांना वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्याकरिता दि.२९ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री सुर्य घर मुफ्त बिजली योजना मंजूर करण्यात आलेली आहे.
घरांवर सोलर रुफटॉप आस्थापित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे २ कि.वॅ. क्षमतेपर्यंतच्या सौर ऊर्जा प्रकल्पांना आधारभूत किंमतीच्या ६०% इतके अनुदान देण्यात येत असून २ कि.वें. ते ३ कि.वें. दरम्यान क्षमता असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांना बेंचमार्क किंमतीच्या ४०% इतके अनुदान देण्यात येत आहे. अनुदानाची मर्यादा ३ कि.वॅ. क्षमतेपर्यत आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांनी सौर ऊर्जा प्रणालीचा अवलंब केल्यास वीजेच्या बाबतीत सदर ग्राहक स्वयंपूर्ण होईल तसेच सदर प्रणालीद्वारे निर्मित वीजेचा वापर करुन शिल्लक राहिलेल्या वीजेतुन त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल.
त्यामुळे सदर उपक्रमातंर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील घरगुती वीज ग्राहकांना राज्यशासनाकडून अधिकच्या अनुदानाची तरतूद करुन, त्यांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्याकरीता प्रोत्साहीत करणे व उपक्रमात त्यांचा सहभाग वाढविणे याकरीता “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (SMART) सोलार योजना” राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


