300 प्रकारच्या आजारांवर शेवग्याचा पाला ठरतोय ‘रामबाण’; शेवग्याची 30 हजार झाडं लावत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग – MORINGA FARMING

आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि जगभर मागणी असणारी शेवग्याची भुकटी अर्थात मोरिंगा पावडर डॉ. बापट यांनी आपल्या शेतातच दळून आणि त्याची छान पॅकिंग करून बाजारात आणली.

शेती परवडणारी नाही, अशी ओरड अनेक शेतकरी करतात. मात्र शेतकऱ्यांच्या अशा नकारात्मक प्रतिक्रियांना छेद देत अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात सावंगी मक्रमपूर गावात डॉ. विश्राम बापट यांनी 9 एकर शेतात 25 ते 30 हजार शेवग्याची झाडं लावून कृषी क्षेत्रात नाव प्रयोग केलाय. विशेष म्हणजे शेवग्याच्या पाल्यापासून भुकटी तयार करून शेतीला व्यवसायाची जोड दिलीय. आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि जगभर मागणी असणारी शेवग्याची भुकटी अर्थात मोरिंगा पावडर डॉ. बापट यांनी आपल्या शेतातच दळून आणि त्याची छान पॅकिंग करून बाजारात आणली. डॉ. विश्राम बापट यांची शेवग्याची शेती आणि त्यावर आधारित व्यवसायासंदर्भात “ईटीव्ही भारत”चा हा स्पेशल रिपोर्ट.

शेवग्याचा पालाच गुणकारी : शेवग्याचा पाला हा अतिशय गुणकारी आहे. पोटाच्या संबंधित समस्या, त्वचेचे आजार यासह एकूण 300 प्रकारच्या आजारांवर हा पाला औषधी म्हणून गुणकारी ठरतो. हा पाला तोडून घेतल्यावर त्याला दीड ते दोन दिवस सोलर टनेल ड्रायर सेंटरमध्ये सुकायला ठेवतो. हा पाला सुकल्यावरदेखील हिरवाच राहतो. हा पाला शेतातच लावलेल्या चक्कीमध्ये दळतो आणि याची भुकटी तयार केली जाते. ही भुकटी साध्या पाण्यात सकाळी घेतली की पोट अगदी साफ होतं. सांधेदुखी थांबते. शरीरात दिवसभर ऊर्जा राहते, त्वचेवरील डाग नाहीसे होतात. एकूण तीनशे प्रकारच्या व्याधी शेवग्याच्या भुकटीचं सेवन केल्यानं नाहीशा होतात. मी स्वतः नियमित चहासोबत, तर कधी पाण्यात ही भुकटी घेतोय. आज वयाच्या 68 व्या वर्षी देखील कामासाठी ऊर्जा माझ्यामध्ये आहे, असंही डॉ. विश्राम बापट म्हणतात.

शेतीला अशी दिली व्यवसायाची जोड : कृष्णसृष्टी या नावानं डॉ. विश्राम बापट यांनी ब्रँड तयार केला. ही भुकटी अमरावतीला घराच्या परिसरातच उभारलेल्या पॅकिंग सेंटरमध्ये पॅक केली जाते. या भुकटीपासून बिस्कीट, चहा पावडर, फेसपॅक अशी विविध उत्पादनं सेंटरमध्ये तयार केली जातात. या उत्पादनांची ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री केली जाते. अमरावती आणि नागपूर शहरात अनेक ठिकाणी ही उत्पादनं उपलब्ध करून दिलीत. शेतीला जोड व्यवसाय हवा असं म्हणतात, आम्ही शेतातून मिळणारा शेवग्याचा पाला वापरून व्यवसाय सुरू केला, असं डॉ. विश्राम बापट म्हणाले.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत