निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१ नोव्हेंबर, २०२५ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ भरून अर्ज करण्याचे आवाहन पदवीधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाची सुरुवात ३० सप्टेंबर २०२५ (मंगळवार) रोजी जाहीर सूचना प्रसिध्द करण्याने झाली आहे.
मतदार नोंदणीसाठी नमुना १८ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ (गुरुवार) आहे.
अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) रोजी होईल. याच दिवसापासून दावे व हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल, ज्याची अंतिम मुदत १० डिसेंबर, २०२५ (बुधवार) आहे.
दावे व हरकतींवर २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) पर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार) रोजी होणार आहे.
नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रता आणि नियम
खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे
-अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पदवी परीक्षा अर्हता दिनांकाच्या (०१/११/२०२५) तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.
-तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर/प्रसिध्द केल्याचा दिनांक गृहीत धरला जाईल, दीक्षांत समारंभाची तारीख नाही.
-मतदाराचे नागपूर पदवीधर मतदार संघात सर्वसाधारण रहिवास असावे आणि तो भारताचा नागरिक असावा.
जरी तुमचे नाव सन २०२० च्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी, २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना १८ मध्ये अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे करता येईल. पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना १८ आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो.
गठ्ठा पध्दतीने (मोठ्या संख्येने) नमुना १८ अर्ज वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे, अथवा राजकीय पक्ष यांना सादर करता येणार नाही. तथापि, विभाग प्रमुख त्यांचे अधिनस्थ पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांचे नमुना १८ चे दावे एकत्रित सादर करू शकतात.
तसेच, कुटुंबातील व्यक्ती त्याच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो, परंतु यासाठी दोघांचा रहिवास पत्ता सारखा असणे अनिवार्य आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना-१८ अर्ज आवश्यक पुराव्यांसह ०६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे

