घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर…

 घरकुल योजना ग्रामीण लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ५०,००० रुपयांचे वाढीव अनुदान मंजूर…
 घरकुल योजनेच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना आता ५०,००० रुपये वाढीव अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने याबाबत १० नोव्हेंबर २०२५ रोजी तीन स्वतंत्र शासन निर्णय (GR) जारी केले आहेत. या निर्णयामुळे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण आहे, त्यानुसार राज्यातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) चा दुसरा टप्पा २०२४-२५ ते २०२८-२९ पर्यंत राबवण्याचे निश्चित केले आहे.
 या पार्श्वभूमीवर, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि विविध राज्य पुरस्कृत घरकुल योजनांतर्गत २०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी हे ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान राज्य शासनाच्या हिश्यातून दिले जाईल.
या वाढीव अनुदानामुळे, घरकुल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एकूण अनुदानात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी १,६०,००० रुपये (नरेगाचे सोडून) इतके अनुदान मिळत होते. आता ५०,००० रुपयांची वाढ झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना एकूण २,१०,००० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
अर्थसंकल्पीय निधीतून ही वाढ मंजूर करण्यात आली असून, वाढीव अनुदानाची रक्कम लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरीत केली जाईल. यासाठी ग्राम विकास विभागाने सर्वसाधारण प्रवर्गासाठी नवीन स्वतंत्र लेखाशीर्षक उघडण्याची बाब मंजूर केली आहे. हे वाढीव अनुदान मिळणे, घर बांधणीच्या कामांना गती देण्यासाठी लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे.
 या योजनेची अधिक माहिती आणि अनुदानाच्या टप्प्यांसंदर्भात नवीन माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही तुम्हाला नक्की कळवू.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत