न्यायालयाला मिळाले दोन नवे न्यायमूर्ती
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २१ : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्या. चंद्रशेखर आणि न्या. सुमन श्याम यांनी सोमवारी (ता.२१) शपथ घेतली. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची संख्या ६६ वर पोहोचली आहे.
न्या. चंद्रशेखर यांची राजस्थान उच्च न्यायालयातून तर न्या. श्याम यांची गुवाहाटी उच्च न्यायालयातून बदली झाली आहे. विशेष म्हणजे, न्या. चंद्रशेखर हे मुख्य न्यायमूर्तीं आलोक आराधे यांच्या नंतर उच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती बनले आहेत. ते उच्च न्यायालयाच्या पाच सर्वोच्च न्यायमूर्तीपैकी एक असणार आहेत. त्यांचा जन्म २५ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी १९९३ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ९ डिसेंबर १९९३ रोजी दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. ७ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांची झारखंड उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आणि ७ जून २०१४ रोजी त्यांना कायमस्वरूपी करण्यात आले. त्यानंतर त्यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली झाली. तर न्या. शाम यांनी ३ सप्टेंबर १९९६ रोजी बार कौन्सिल ऑफ आसाम अंतर्गत वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी उच्च न्यायालयात निवडणूक खटले तसेच फौजदारी प्रकरणे हाताळली आहेत.
